मुंबई : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा त्याचप्रमाणे गुजरातच्या विधानसभेची निवडणुकीतही रिपब्लिकन पक्ष भाजपला पूर्ण पाठिंबा देणार आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपला विजयी करण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत 12 नोव्हेंबरला मतदान होत असून त्या पार्श्वभूमीवर आज शिमला येथे रिपब्लिकन पक्षाच्या हिमाचल प्रदेश राज्य शाखेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वसंमतीने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एकही जागा न लढविता सर्व जागांवर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्षाने घेतला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. यावेळी रिपाइंचे हिमाचल प्रदेश अध्यक्ष विजय शर्मा आणि प्रभारी विवेक कुमार झा उपस्थित होते. हिमाचल प्रदेश चे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेशात चांगले काम चालले आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशात रिपब्लिकन पक्ष भाजप च्या पाठीशी उभा राहिला आहे असे रामदास आठवले म्हणाले. हिमाचल प्रदेशात 28 टक्के दलित मतदार असून या निवडणुकीत भाजप ला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशा सूचना रामदास आठवले यांनी दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर चांगले काम होत आहे. मागील 8 वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात विकास होत आहे. गोरगरिबांचे प्रश्न सोडविणारे; गोरगरिबांना न्याय देणाऱ्या मोदींच्या नेतृत्वासाठी भाजपला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी गरिबांना न्याय देणारे सरकार सत्तेत आणले पाहिजे. सर्वांना साथ सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्वास या समतामुलक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला देशभर साथ देताना दलित बहुजनांनी गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजप उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.