बालाजी सुरवसे | धाराशिव : एकनाथ शिंदे यांनी अभूतपुर्व बंड केल्याने राज्यात सत्तातंर घडून आले होते. हे बंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घडवून आणल्याचा दावा ठाकरे गट सातत्याने करत आहे. परंतु, फडणवीसांनी हा दावा फेटाळून लावला होता. अशातच, शिंदे गटाचे नेते व आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस, मी व एकनाथ शिंदे आमच्यात 2019 सालीच सत्ता बदलाचा फॉर्म्युला ठरला, असे मोठे विधान त्यांनी केले आहे. धाराशिवमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
तानाजी सावंत म्हणाले की, 2019 सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो. जनतेने कौलही आमच्या बाजूने दिला. मात्र, उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी दीडशे बैठका घेतल्या. यात आमदारांचे काउन्सलिंग करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सावंत यांच्या या गौप्यस्फोटाने राज्यातील सत्ता बदलात माझा काही हात नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर संशय निर्माण झाला आहे.
तर, शिवसेना-भाजपच्या युतीत मिठाचा खडा महाराष्ट्राचे जाणते राजे या नावाने भारतभर ओळखले जाणाऱ्यांनी टाकला, अशी अप्रत्यक्ष टिकाही तानाजी सावंत यांनी शरद पवार यांच्यावर केली. तसेच, उध्दव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या २५ टीएमसी पाण्यासंदर्भात माझ्या सांगण्यावरूण बैठक लावत पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे म्हणत त्यांनी उध्दव ठाकरेंची स्तुती केली आहे. आता तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजप जवळीकता वाढणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.