अमरावती : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. तर, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. यावरुन आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी संजय राऊतांना जैसी करनी वैसी भरनी, असा टोला लगावला आहे.
रवी राणा म्हमाले की, संजय राऊत यांची ईडीने अनेकदा चौकशी केली आहे. राऊतांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. मुंबई महानगरपालिकेत कोणाला कंत्राट लागले तर संजय राऊत मॅनेज करतात. संजय राऊत यांना अटक केली जाईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या गोटात गेले. महाविकास आघाडी स्थापन करण्यात संजय राऊत यांचा पुढाकार होता. आमच्यावर हनुमान चालीसा वाचली यावरून राजद्रोह दाखल केला. आमच्यावर सुद्धा अत्याचार करण्यात आला. म्हणून जैसी करनी वैसी भरनी, असा टोला रवी राणा यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
दरम्यान, ईडीने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. मात्र, संसदेचं अधिवेशन असल्याचं सांगून राऊत ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. तसेच त्यांनी ईडीकडून चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. यानंतर आज ईडीचे दिल्लीतील अधिकारी मुंबईत दाखल झाले असून सकाळीच राऊतांच्या घरी धाड टाकली. त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. तर, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.