मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. यानंतर आज त्यांना पीएमएलए न्यायालयासमोर (PMLA Court) हजर केले जाणार आहे. तर, ईडीने संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपयेही जप्त केले आहेत. त्यापैकी 10 लाख रुपये पक्षाचे होते, त्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव लिहील्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने रविवारी धाड टाकली होती. संजय राऊत यांच्या वेगवेगळ्या मालमत्तांवर छापे टाकण्यात आले असून, भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या. यानंतर अखेर साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. व रात्री 12 वाजता अटक केल्याचे जाहीर केले.
सुत्रांनुसार, संजय राऊतांच्या घरातून 11 लाख 50 हजाराची रक्कम ईडीने जप्त केली आहे. या साडे अकरा लाखांचे हिशोब ऑफ द रेकॉर्ड मिळाले आहेत. त्यापैकी 10 लाख रुपये पक्षाचे होते, त्यावर एकनाथ शिंदे, अयोध्या असे लिहिलेले होते. उरलेले दीड लाख रुपये घरातले घर कामासाठी ठेवलेले होते, अशी माहिती ऑफ रेकॉर्ड दिली आहे. या पैश्यांची नोंद आणि त्यावर लिहिलेले याची नोंद ED ने घेतली आहे.
संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी खुलासा केला आहे. ईडीने जप्त केलेली रक्कम ही अयोध्या दौऱ्याशी संबंधित होती. घरात असलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि सोबत काही कागदपत्रेही ईडीने सोबत नेली आहेत, अशी माहिती सुनील राऊत यांनी दिली.
दरम्यान, संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. संजय राऊत यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी होण्याची शक्यता आहे.