रवी जयस्वाल | जालना : राज्यात अनेक विषयावरून राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत असले तरी दोन्ही गटाचे नेते खुष नसल्याचे दिसत आहे. शिंदे गटाचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी अनेक मतदार संघांमध्ये फडणवीस व शिंदेंनी युती करण्याबाबत विचार करावा, असे सूचक वक्तव्य केले होते. यामुळे सत्तार भाजसोबत खुश नाहीत, अशा चर्चा होत्या. अशातच आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती, असे म्हंटले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत शिंदे-भाजप स्वतंत्रपणे लढणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू आणि निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊन जिल्हापरिषद ताब्यात घेऊ. त्याचबरोबर ज्या त्या जिल्ह्यावर निर्णय सोडला असून सत्तार आणि आम्ही बसू जमलं तर भाई भाई नाही तर कुस्ती, असा सूचक इशाराच त्यांनी सत्तारांना दिला आहे.
काय म्हणाल होते अब्दुल सत्तार ?
ज्या ज्या मतदार संघामध्ये माझ्या मतदारसंघासारखी परिस्थिती आहे त्या त्या मतदारसंघामध्ये युती न करता मैत्रीपुर्ण लढतीबाबत विचार केला जावा. शेवटी निवडून आल्यानंतर सत्ता स्थापन करताना आपण दिल्लीमध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सोबतच राहू. स्थानिक पातळीवर आमच्यामध्ये मैत्रीपुर्ण लढत ही झालीच पाहिजे. पण, दोन्ही पक्षांमधील जो कोणी निवडून येईल तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता राहील, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं होते.