येत्या 5 ऑक्टोबर रोजी मुंबईत शिंदे गटाचा आणि शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. या दोन्ही दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर मुंबईच्या बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. या निमित्ताने दोन्हीही पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली असून मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी चालवली आहे. यावरच शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी या मेळाव्यांबाबत खंत व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, दोन ठिकाणी वेगळा मेळावा होत आहे. जे नको व्हायला पाहिजे ते होत आहे. दोन मेळावे होत आहेत त्यामुळे आपण समाधानी नाही. पक्ष उभा केलाय. केसेस घेतल्या आहेत. सगळं आपण भोगलंय. त्यामुळे दुःख होत आहे, अशी वेदना रामदास कदम यांनी बोलून दाखवली आहे.
शिवसेनेचे भगवे झेंडे दोन्ही ठिकाणी दिसणार आहेत. बाळासाहेबांचे फोटो सुद्धा दोन्ही ठिकाणी असतील. शिवसेनेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. त्याचं आपल्याला दुःख झालंय, दोन मिळावे शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेत नाही. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार मांडू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोकं चातकासारखे वाट बघत होते. ते विचार उद्धव ठाकरे देऊ शकत नाहीत. विचार बाळासाहेब यांचेच. बाकी कुणाचे नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे फक्त अफजलखानाचा विषय आणि भाजप टार्गेट असेल, असा टोला त्यांनी लगावला.