संजय देसाई | सांगली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच, यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही आठवलेंनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे, असा सल्लाच त्यांनी दिला आहे.
नागालँड प्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीए सोबत यावे, असे निमंत्रण देत शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध असून मोदींकडून पवारांचें अनेक वेळा कौतुक केले आहे. तसेच शरद पवारांनी कितीही विरोधी पक्षाला एकत्र करून आघाडीच्या बैठका घेतल्या. तरी 2024 मध्ये पुन्हा एनडीएचे सत्ता येणार आहे, असेही मंत्री आठवले यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य असून राहुल गांधी हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमध्ये भाजपाचा संबंध नसून राहुल गांधींनी याआधी अनेक वेळा चुकीचे वक्तव्य केले आहे. एकदा त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले तोंड सांभाळून बोलले पाहिजे. तसेच, मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला आहे.
मनसे नेते राज ठाकरे यांच्यावरही रामदास आठवले यांनी टीका केली आहे. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. मुंबईचा शिंदे-फडणवीस विकास करत असताना त्याला डान्सबार म्हणणं चुकीचं आहे. तसेच, राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे.भोंग्याना विरोध करू नये आणि राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
राज्यातील शिवसेनेच्या आणि सत्ता संघर्षाच्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूनेच निकाल लागेल असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेले. पण, बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरेंवर ही वेळ आली नसते आणि शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार आहेत, असा आरोप देखील मंत्री आठवले यांनी केला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दोन जागा मिळाव्यात, अशी आपली मागणी राहणार आहे. त्याच बरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विधान निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असून मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस त्याचबरोबर अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा देखील करणार असल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले आहे.