राज्यात एकीकडे प्रचंड राजकीय गदारोळ सुरु असताना त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. यावरूनच आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. सोबतच विरोधक देखील यावरून भाजप आणि शिंदे गटावर टीका करत आहे. मात्र, याच आता वादावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांची समजूत काढणार असून जागा वाटपाबाबत योग्य तो निर्णय व्हायचा असल्याचे आठवले यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे आज नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बावनकुळे यांच्या विधानावर भाष्य केले ते म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेच्या युतीत आम्हीही आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत आम्हाला जाग्या हव्यात. सोबतच त्यांनी एक मंत्रीपद आणि एक विधान परिषद सदस्यत्व आणि दोन ते तीन महामंडळ देखील मिळावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर आरपीआय शिवसेना आणि भाजपसोबत राहिली तरच फायदा होईल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळेंच्या 50 जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली असून 28 मे ला शिर्डीत अधिवेशन होणार असल्याची माहिती देत त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलावणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.