भूपेश बारंगे | वर्धा : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु, अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
नागपूरहून चंद्रपूरला जात असताना हिंगणघाट येथील कार्यक्रमात राजमदास आठवले यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पात्राला काही अर्थ नाही. राज ठाकरेंचं मत असलं तरी निवडणूक लढली पाहिजे. शिवसेनेच्या ऋतुजा लटके उमेदवार आहेत. त्या ठिकाणी रिपाइंन भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठींबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे. त्यामुळे जो अंधेरी पूर्वचा जो गड आहे तो आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंच्या मागणीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषद घेत निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली.