अमजद खान|कल्याण: राज्यात राजकीय गोंधळ घडत असताना बंडखोरीमुळे शिंदे आणि शिवसेना वाद आणखीच उफाळत चालला आहे. नक्की शिवसेना कोणाची हा वाद कोर्टात असताना आता दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरु आहे. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मेळाव्यावर प्रतिक्रिया घेत शिंदेंची बाजू घेतली आहे.
खरी शिवसेना शिंदेंची
खरी शिवसेना आहे ते एकनाथ शिंदे यांची आहे. त्यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळतोय, त्यामुळे दसरा मेळाव्याला खऱ्या शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ,उद्धव ठाकरे यांनी बीकेसी यांनी इतर कुठे मेळावा घ्यायला हरकत नाही. मात्र, शिवाजी पार्क येथील शिवसेनेचा दसरा मेळावा हा एकनाथ शिंदेंचाच झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी अशी आमची महापालिकेला सूचना असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.
बाळासाहेबांचा फोटो वापरण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार
बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरण्यावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टोला लगावला होता. यावर आता बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे बोलताना आठवले म्हणाले की, बाळासाहेबांचं फोटो वापरण्याचा एकनाथ शिंदेंना अधिकार आहे ,त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेत ,बाळासाहेब हे काही एकट्या उद्धव ठाकरेंची होऊ शकत नाही. ते सर्व शिवसैनिकांचे आहेत. त्यांच्याच तालमीत मध्ये तयार झालेले एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचा फोटो वापरायला हरकत नाही. शिवाजी महाराजांचा फोटो सगळे वापरतात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सर्वजण वापरतात तसा बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे लोकांना त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे. तो काय फक्त उद्धव गटालाच वापरण्याचा अधिकार असला पाहिजे असं काही नाही. असे विधान त्यांनी यावेळी बोलताना केले.