मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चा सुरु आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याकडे आता पुन्हा एकदा इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अशातच, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एका मंत्रीपदाची मागणी केली आहे.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात रिपब्लिकन पक्षाला 1 पद मिळाले पाहिजे, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. याशिवाय महामंडळ आणि कमिटी मध्ये हिस्सा मिळाला पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीबाबातही त्यांनी भाष्य केले आहे. लोकसभेच्या 2 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. यातील एक शिर्डी आणि विदर्भातून एक जागा मिळावी आणि विधानसभेच्या 10 ते 15 जागा मिळाव्या, अशीही मागणी आठवलेंनी केली आहे. यामुळे रामदास आठवलेंची मागणी शिंदे-फडणवीस पूर्ण करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
तर, संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देताना रामदास आठवले म्हणाले की, संजय राऊत वेगवेगळ्या टीका करतात. मात्र, शिंदे-फडणवीस आणि आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्य करीत आहोत. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला यश मिळेल, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लवकरच लागणार असून हा छोटेखानी असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळ विस्तारत भाजपच्या सहा व शिवसेनेच्या चार जणांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे चार कॅबिनेट मंत्री तर दोन हे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे दोन कॅबिनेट मंत्री तर दोन आमदार राज्यमंत्री होतील, असे समजत आहेत.