पुणे : विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपात जाणार, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी पक्षप्रवेशाची थेट ऑफरच दिली आहे. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच आहे. आणि आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी अजित पवारांना दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे असून पवारसाहेबांनी त्यांना अनेक पद दिली आहेत. ते आजारी असल्याने नॉट रिचेबल होते. मला वाटत नाही ते भाजपात जातील. ते देवेंद्र फडणवीस यांचे चांगले मित्र त्यांनी एकदा पहाटे शपथ पण घेतली होती, असे त्यांनी सांगितले. अजित पवार हे माझ्या पक्षात आले तर आनंदच आणि आम्हाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती त्यांना देऊ, अशी ऑफरच रामदास आठवले यांनी अजित पवारांना दिली आहे.
तर, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर बोलताना रामदास आठवले म्हणाले, आदित्य ठाकरेंचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. एकनाथ शिंदे रडले म्हणून उध्दव ठाकरे पडले, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच, एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहेत. ते रडणार नाहीत. एवढे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत जातील. उध्दव ठाकरेंना कंटाळून ते गेले, अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली आहे.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी ट्विट करत मोठा दावा केला होता. याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानियाबाबत मी काय बोलणार नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला होता.