राजकारण

...म्हणूनच गांधींसारखा दुसरं कोणी होणे नाही : राज ठाकरे

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती असून संपूर्ण देशातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही सोशल मीडिया पोस्टद्वारे महात्मा गांधींनी अभिवादन केले आहे. गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हंटले आहे.

काय आहे राज ठाकरे यांची पोस्ट?

महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधींजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण, जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.

विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले. कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले. पण, त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं.

पण, गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं. श्रृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या श्रृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही. कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत. इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही. आज महात्मा गांधी जयंती. गांधीजींच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण