मुंबई : वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्रातील प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाणार यावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. अशात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. हा प्रकार गंभीर आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, फॉक्सकॉन-वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा, असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मागच्या पेक्षा आता गुजरातने अधिक इनसेटीव्ह दिलेला आहे. कंपनी गेल्यानंतर राजकारण करण्यापेक्षा ती आणण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंतांनी केले आहे. माझं इतर कंपन्यांशी ही बोलणं सुरु आहे. विभाग लक्षात घेऊन कोणते उद्योग आणता येईल या संदर्भात माझं बोलणं सुरु आहे. त्यांच्या इतकं उद्योग आणण्यासाठी आमच सरकार सक्षम आहे, असेदेखील सामंतांनी सांगितले आहे.