पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असं न्यायालयाने सांगितल्यानंतर काल भारताच्या निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. धनुष्यबाण हे चिन्ह पुढील निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसंच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही शिवसेना या नावासोबतच आणखी काही शब्द जोडावा लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया मांडली आहे. मात्र, एकेकाळचे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट भुमिका मांडलेली नाही.
दरम्यान या सर्व राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे यांनी ट्वीट करून मनसेमधील सर्वांना एक संदेश दिला आहे. या ट्वीटमध्ये राज ठाकरेंनी सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या विषयात कोणत्याही प्रकारे न बोलण्याचा संदेश वजा आदेश दिला आहे.
काय लिहीलंय राज ठाकरेंनी?
'सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन.'
त्यामुळे आता राज ठाकरे आपली भुमिका कधी मांडणार व नेमकी काय भुमिका मांडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.