पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने द्यावा असं न्यायालयाने सांगितल्यानंतर काल भारताच्या निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा बहुप्रतिक्षित निर्णय दिला. धनुष्यबाण हे चिन्ह पुढील निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. तसंच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही शिवसेना या नावासोबतच आणखी काही शब्द जोडावा लागणार आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया मांडली आहे. मात्र, एकेकाळचे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू यांनी अद्याप स्पष्ट भुमिका मांडलेली नाही.
राज ठाकरेंनी काय केलं आवाहन:
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांसह मनसे नेते व प्रवक्त्यांकडूनही यासंदर्भात भुमिका मांडण्यात आली आहे. मात्र, "या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका" असं आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केलं असल्याची माहिती आहे.
धनुष्यबाण गोठल्यानं राज ठाकरेंना दु:ख?
दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं गेल्यानंतर मराठवाड्यातील मनसे नेते प्रकाश महाजन यांना एका माध्यमाद्वारे प्रतिक्रिया विचारली असता, "धनुष्यबाण गोठवला गेल्यानंतर राज ठाकरेंनाही दु:ख झालं असेल" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.