मुंबई : मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी रिलस्टारचे कौतुक केले.
राज ठाकरे यांनी भाषण सुरु असतानाच अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता, असे म्हणत रिल्सस्टार अथर्व सुदामे आणि विनायक माळी यांना स्टेजवर बोलवून घेतले. तुमच्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरं का, अनेकांच्या पाहतो, असे कौतुक राज ठाकरेंनी विनायक माळी आणि अथर्व सुदामे यांचे केले आहे. अनेक लोकं येथे असतील. माफ करा, भेदभाव करत नाहीयं. पण, मला समोर बसलेला दिसला म्हणून बोलावले, असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
मला फक्त सांगायचं आहे की, तुमच्यावर आज खूप मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रात होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुमच्या रिल्सच्यामार्फत प्रबोधन झालं पाहिजे. आता सध्या राजकारण ज्या खालच्या थरावर गेलं आहे त्या थरावर तुम्हाला जायची गरज नाही. पण मला असे वाटते की, तुम्ही तुमच्या विनोदी पद्धतीने महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे जेणेकरुन अनेकांना त्याची जाणीव होईल, असेही राज ठाकरेंनी म्हंटले आहे.