मुंबई : मुंबईतील व्हिजेआयटी कॉलेजच्या रंगवर्धन या सांस्कृतिक कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थीशी संवाद साधला. आपण शिवाजी महाराज यांचे वारसदार आहोत हे विसरू नका. दुसऱ्यांसमोर मिंधे होऊ नका. कधीही जातीपातीच्या भानगडीत पडू नका, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले, आपण शिवाजी महाराज यांचे वारसदार आहोत हे विसरू नका आणि कोणाचे मिंधे होऊ नका. मी व्यंगचित्र काढतो म्हणून जे मला दिसतंय ते अनेकदा माझ्या भाषणात दिसतं. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की छत्रपतींना आपण नीट समजून घेतले पाहिजे. मी शिववेडा आहे, आपला वारसा आपण जोपासायला पाहिजे.
औरंगजेब बादशाह इतका मोठा होता तो आग्र्यानंतर महाराजांना मारायला आला होता. १६८० साली महाराज गेलेत आणि १६८१ ला इथं औरंगजेब आला आणि २७ वर्षांनंतर मेला. काही पत्रात औरंजेबाचं वाक्य आहे शिवाजी अजून मला छळतोय. औरंगजेबाला शिवाजींचा विचार मारायचा होता मात्र तो मेला नाही, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
अटकेपार आपण झेंडे फडकवलेत. आपण यांचे वारसदार आहोत हे विसरु नका आणि दुसऱ्यांसमोर मिंधे होऊ नका. कधीही जातीपातीच्या भानगडीत पडू नका. मित्र मैत्रिणी करताना जात बघू नका. ज्यांना यातून मतं हवीत त्यांचे कल्याण करु नका. आपण हिंदू आहोत ऐवढंच लक्षात ठेवा. जाती-जातीमुळे विचका झालाय. परदेशी मुलं इथल्या वातावरणामुळे देखील जातात. शिक्षणासंदर्भातल्या गोष्टींची पर्याय मी उभा आहे. मराठी वाढवायची तर मराठीत बोला, हिंदीत बोलत असेल तर मराठीत बोला, असा सल्लाही राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना दिला.