नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकदिवसीय नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांचा तीन महिन्यातील हा दुसरा दौरा आहे. तर, हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस असून राज्यातील सर्वच नेते सध्या नागपुरात दाखल झालेले आहेत. अशातच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अजित अभ्यंकर हेदेखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. परंतु, या चर्चेचा तपशील समोर येऊ शकलेला नाही.
याबद्दल राजू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली? हे आम्ही कसं काय सांगू शकतो. तर युतीबाबत राजू पाटील यांनी सध्यातरी असंच चित्र दिसतंय. हे सरकार चांगलं काम करतंय. सांगितलेल्या सूचना ऐकून घेतल्या जातात, असे म्हंटले आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे मेळावा झाला आहे. या मेळाव्यात त्यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पत्र वाटप करण्यात आली. यावेळी आजचे राजकारण बघिल्यावर सगळ्या गोष्टी पटकन हव्या आहेत. मात्र, त्यासाठी जीवाचे रान करावे लागते. माझ्या आयुष्यात अनेक संकटे आली, खचलो नाही कधी, खचणारही नाही, असे त्यांनी मार्गदर्शन केले आहे.