मुंबई : ईशान्येकडील मणिपूर राज्य मागील 56 दिवसांपासून हिंसाचाराच्या आगीत धगधगत आहे. यामध्ये आतापर्यंत 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तीन हजारांहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. सुमारे 50 हजार लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार आणि देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे यावर गप्प का? असा सवालही राज ठाकरेंनी विचारला आहे.
व्हिडीओत काय?
‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये अमिताभ बच्चन एका ईशान्य भारतातील मुलीला कोहिमा शहर कोणत्या देशात आहे हा प्रश्न विचारतात. यासाठी अमिताभ बच्चन चीन, नेपाळ आणि भारत असे तीन पर्याय सांगतात. तर, दुसरीकडे ही मुलगी या शोमध्ये पोहचल्याचे पाहून काही नागरिक चेष्टा मस्करी करताना दिसत आहेत. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही मुलगी ऑडियन्स पोलची निवड करते. यानंतर अमिताभ बच्चन पोलमध्ये १०० टक्के लोकांनी कोहिमा शहर भारतात असल्याचे सांगितले. हे उत्तर सर्वांनाच माहिती अशल्याचेही बच्चन म्हणताना दिसत आहेत. यावर ती मुलगी म्हणते, सर्वांनाच माहिती आहे, पण ते किती जण मानतात, असा प्रश्न करते. यावेळी इतर ईशान्य भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर आपलेच दुःख मांडल्याचे समाधान दिसते.
या व्हिडीओच्या शेवटी मणिपूर हिंसाचाराचे काही दृश्य दाखविण्यात आली असून राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले आहेत. गेले दोन महिने ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः संतापाने धुमसतंय. केंद्र सरकार असो वा देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणारे तथाकथित देशभक्त यांनी मौन का बाळगलं आहे? दुखवालेल्या मनांना आधार द्यायला हवा अन्यथा ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. तसेच मणिपूरमधील हिंसाचार रोखा, तिथे शांतता प्रस्थापित करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
गैर-आदिवासी मेईतेई समुदायाची अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा ही मागणी होती. मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मेईतेई समुदायाच्या मागणीवर चार आठवड्यांत केंद्राकडे शिफारस पाठविण्यास सांगितले होते. याविरोधात चुराचंदपूर जिल्ह्यातील तोरबांग भागात 'ऑल ट्रायबल स्टुडंट्स युनियन मणिपूर' (एटीएसयूएम) ने आदिवासी एकता मार्च पुकारला होता. या मोर्चादरम्यान काही लोकांनी मेईतेई समुदायाच्या सदस्यांवर कथित हल्ला केला होता. यामुळे राज्यभर हिंसाचार उफाळला आहे.