राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उफळला आहे. काल मंगळवारी वाद तीव्र झाला होता. कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी या हल्ल्याचा निषेध करत राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्यातच विरोधक आक्रमक झालेले असताना त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. असा देखील आरोप त्यांनी यावेळी कर्नाटक सरकारवर केला आहे.
काय मांडली राज ठाकरे यांनी भूमिका?
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं. असे राज ठाकरे पत्रात म्हणाले आहे.
मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कतन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे. अशी भूमिका राज ठाकरे यांनी यावेळी मांडली आहे.