भारत गोरेगावकर | रायगड: राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील बंड झाली. या बंडामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच उलथापालथ झालीय. त्यातच दुसरीकडे रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत जात सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर आता रायगडमधील शिवसेना ठाकरे गट तटकरेंविरोधात आक्रमक झाला आहे. त्यातच आज ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी तटकरेंवर जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी तटकरेंविरोधात स्वत:ची उमेदवारी देखील जाहीर केली आहे.
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्यासोबत राज्याच्या सत्तेत सहभाग घेतल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तटकरें विरोधात दंड थोपटले आहेत. उबाठा सेनेचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात गीते यांनी तटकरे यांना टिकेचे लक्ष्य करताना सुनील तटकरे हेच महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी उमेदवार होते. परंतु, त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते अजित पवार यांच्यासोबत गेले त्यामुळे आता माझा मार्ग मोकळा झाला असून हा मेळावा म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा शुभारंभ आहे, असे समजा असे आवाहन करून स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर करून तटकरे यांना थेट आव्हान दिले. मात्र, गीतेंच्या या आव्हानामुळे आता रायगडमध्ये तटकरे विरूद्ध उबाठा असा राजकीय सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.