मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेचे शोषण केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असून याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
राहुल शेवाळे म्हणाले की, माझा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केले. त्याविषयी माहिती देण्यासाठी मी आज समोर आलो आहे. सदर महिलेची बॅकग्राउंड क्रीमिनल आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे. कोरोना काळात माझ्या मित्राच्या सांगण्यावरून मी आर्थिक मदत केली होती. जेव्हा तिला मी पुन्हा मदत केली नाही. त्यामुळे तिने माझ्यावर आरोप लावले आहेत.
दिल्लीवरून दुबईला गेली व एक फेक अकाउंट बनवून ब्लॅकमेलिंग होत आहे. याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. मी आणि माझ्या पत्नीने दुबई पोलिसांत तक्रार दिली आहे. दुबई पोलिसांनी तपासानुसार ही महिला पाकिस्तान एजंटच्या माध्यमातून हे फेक अकाऊंट्स चालवत होती. या पाकिस्तानमधील एजंटच्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला आणि पत्नीचे फेक अकाउंट बनवून ब्लॅकमेलिंग करत होती. सदर महिला दाऊद गँगसोबत संबंधित आहे. हे साधं प्रकरण नाही, हा अंतराष्ट्रीय कट आहे. सदर महिलेचा तपास सुरु असून ती फरार असल्याचे समजते आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा, असा राष्ट्रवादीचा सुरुवातीपासूच प्रयत्न होता. पण, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची सर्व खात्री करून घेतली होती. केवळ शिवसेना सोडल्यामुळे युवासेना प्रमुखांच्या मनात राग आहे. मी संसदेत AU उल्लेख केला. त्यामुळे युवासेनाप्रमुखांना राग आला आहे. म्हणूनच मला बदनाम करण्यासाठी हे प्रकरण वारंवार काढलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रवादी पक्षाचे संबंध काय दाउद गँग सोबत हे सर्वांना माहिती आहे. संपूर्ण प्रकरणाचा तपास एनआयएच्या माध्यमातून करावा, अशी मागणी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहे. सीडीचा उल्लेख वारंवार युवासेना प्रमुख करत आहेत, मीच म्हणतो त्या सीडीची एनआयए माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.