मुंबई : विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं धक्कादायक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावरुन आज अधिवेशनात एकच गदारोळ झाला असून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. संजय राऊतांवर हक्कभंगाचा आणण्याची जोरदार मागणी सत्ताधारी पक्षांकडून करण्यात आली आहे. यावर विधाससभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भूमिका मांडली. दोन दिवसांत चौकशी करुन बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांच्याविरोधात विशेष अधिकार भंगाची सूचना उपस्थित केली आहे. अतुल भातखळकर यांनी नोटीस दिली आहे. टीव्ही चॅनेलद्वारे विधीमंडळ नव्हे चोर मंडळ म्हणणे ही बाब अपमानास्पद आहे. विधीमंडळ सदस्यांचा अपमान झाला आहे. हा संविधानाचा अवमान आहे. ही गंभीर बाब असून सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कार्यावर प्रतिकात्मक परिणाम करणारी आहे. राज्याच्या जनतेचाही अपमान करणारे वक्तव्य असून याची सखोल चौकशीची गरज आहे. दोन दिवसांत चौकशी करुन बुधवारी ८ मार्च रोजी पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.
तर, उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, हे सगळं प्रकरण तपासून घेण्यासाठी मला 1 दिवस लागेल. मी हक्कभंग आणणार नाही असं बोललेल नाही. हे वक्तव्य गांभीर्याने मी देखील घेतलं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी नेते आक्रमक झाले असून वेलमध्ये उतरत त्यांनी घोषणाबाजी केली. संजय राऊत हाय हाय, संजय राऊतांचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच, विधीमंडळाच्या पायऱ्यांवरही राऊतांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.