मुंबई : 16 आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यावेळी तब्बल दीड तास शिंदे गटाने तर पावणेदोन तास ठाकरे गटाने युक्तीवाद केला आहे. यावेळी उध्दव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरही शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. तसेच, पुरावे सादर करण्यासाठी मदत देण्याची मागणी शिंदे गटाने केली आहे. परंतु, हा केवळ वेळकाढूपणा असल्याचे ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हंटले आहे. दरम्यान, पुढील 2 नोव्हेंबरला होणार आहे.
सर्व अपात्रता याचिकांवर पुराव्यांची गरज नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही, असेही ठाकरे गट अर्जात बोलत आहेत. पण, हे त्यांचे म्हणणे आहे आम्हाला वाटते काही पुरावे सादर करण्याची गरज आहे. यामुळे १४ दिवसांची मुदत द्यावी, काही ठोस पुरावे आम्हाला सादर करायचे आहेत, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली आहे.
तर, उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख पदावर झालेली निवडणूक ही नियमबाह्य असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. २१ जून २०१८ रोजी झालेल्या कार्यकारणी बैठकीत ही निवड झाल्याचे सांगितले जात असले तरी त्या दिवशी अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचा दावा शिंदे गटाने करत उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, ठाकरे गटानेही शिंदे गटाला जोरदार प्रत्युत्तर देत युक्तीवाद केली आहे. आता अचानक पुरावे सादर करण्याची जाग त्यांना आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे. राजकीय पक्ष कोणता? हे प्रथमदर्शनी पाहून निकाल द्यावा. त्यासाठी पुरावे मागण्याची गरज नाही. हा केवळ वेळकाढूपणा असल्याचे ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हंटले आहे.