मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यानची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, अध्यक्षांसमोर दोन महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. आजच्या सुनावणीत विशेष करून एक तर व्हीप जो 21 जूनला बजावलेला होता त्यावर प्रश्न प्रभूंना विचारला. त्यासोबतच 21 जूनला वर्षावर झालेल्या बैठकीत उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड हे उपस्थित होते. हे प्रभू यांनी साक्ष नोंदविताना अध्यक्षसमोर सांगितलं. मात्र, सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केला त्यात हे तिघे उपस्थित नसल्याचं सांगितलं. हा विरोधाभास त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिसतो, असे त्यांनी म्हंटले आहे.
व्हिपबाबतीतही सुनील प्रभूंनी जी काही उत्तर दिली त्यावर मी तरी समाधानी नाही. वारंवार सुनील प्रभू यांना नेमकी उत्तर द्या असं सांगून सुद्धा सुनील प्रभू मोठंमोठी उत्तर देत आहेत. व्हॉटस् अॅपवर जरी व्हिप पाठवला तरी त्यावर रिसीव्ह आणि वाचल्यावर ब्लू टिक दिसते. पण, आम्हाला व्हिपच रिसीव्ह झालाच नाहीये. प्रभू गोल गोल उत्तर देत होते. त्यांची दमछाक होत होती. त्यांच्याकडे त्याचे सुद्धा पुरावे नाहीत, असा दावा शिरसाटांनी केला आहे.