सूरत : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरतच्या सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मे रोजी होणार आहे. यावेळी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत सुरतच्या सत्र न्यायालयात उपस्थित होत्या. तसेच, काँग्रेसचे अनेक दिग्गज नेतेही त्यांच्यासोबत आहेत.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरतच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. मानहानी प्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर 11 दिवसांनी राहुल गांधी यांच्या वकिलाने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी सुरत न्यायलयाने राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात राहुल गांधींना 13 एप्रिलपर्यंत जामीन मिळाला आहे. तसेच, राहुलला ठोठावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधातील याचिकेवर 3 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे
काय होते नेमके प्रकरण?
सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे, अशी टिप्पणी केल्याबद्दल भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी करताना सुरत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या न्यायालयाने 23 मार्च रोजी राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याच दिवशी राहुल गांधी यांनाही जामीन मंजूर केला आणि त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित केली होती. सुरत न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर लोकसभेने राहुल गांधी यांना संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले. यामुळे राहुल गांधी आठ वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत.