आदेश वाकळे | संगमनेर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महारांजाविषयी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे सर्वच स्तरातून जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच, राज्यपाल हटावची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली आहे. अशातच, शिवसेनेकडूनही राज्यपालांवर सडकून टीका करण्यात येते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. छत्रपती उदयनराजे भोसलेंकडे वंशज असण्याचे दाखले मागणाऱ्यांनी शहाणपण शिकवू नये, असा टोला शिवसेनेला लगावला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यपालांनी किंवा कोणीही आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अशा प्रकारच्या बोलण्याचे समर्थन करत नाही. उदयनराजे यांच्या ज्या भावना आहेत त्याच आमच्या सर्वांच्या भावना आहेत. ज्यांनी उदयनराजे यांचे वंशज असण्याचे दाखले मागितले अशा लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही. मी राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्य सगळ्यांना वेदना आणि दुःख देणारी घटना होती. परंतु, सोईनुसार ज्यांना हिंदुत्वाची वापर करण्याची ज्यांना सवय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून आतापर्यंत त्यांनी प्रयत्न केला ते आज त्या प्रश्नाचा वापर करून महाराष्ट्राला पेटू पाहत आहेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला आठवण करून द्यायची आहे की, औरंगजेब यांच्या कबरीवर ज्यावेळी येथे फुलं वाहत होते. त्यावेळी यांची मनगट कोणी बांधून ठेवली होती. त्यावेळी तुम्ही देशभक्त आणि देवपूजा करणाऱ्या व्यक्तींविरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला निघाले होते. मात्र, औरंगजेबाच्या कबरेवर फुले वाहिली जात होती त्यावेळी तुमचा मर्दपणा कुठं गेला होता. आराध्य दैवत शिवराय महाराजांविषयी केलेलं चुकीचे वक्तव्य हे महाराष्ट्रातील जनता खपून घेणार नाही. महाविकास आघाडीच्या काळात हिंदुत्वाला पद्धतशीरपणे राजकारणाच्या सोईप्रमाणे वापरणाऱ्या या नेते मंडळींना आज हिंदुत्व आठवतंय. मात्र, अडीच वर्षे त्या विचारांना तिलांजली देण्याचं काम त्यांनी केले. त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अशीही टीका विखे-पाटलांनी केली आहे.