देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या केरळच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाषणा दरम्यान त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. केरळमध्ये सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटीक फ्रंट(एलडीएफ) आणि काँग्रेसप्रणीत विरोधी आघाडी यूनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट(यूडीएफ)ची केवळ नावं वेगळी आहेत आणि दोन्ही आघाड्यांमधील मॅच फिक्सिंग हे केरळच्या राजकारणातील सर्वात वाईट रहस्य आहे. असं मोदी म्हणाले.
सत्ताधारी एलडीएफ, काँग्रेसप्रणीत युडीएफ आणि भाजपाप्रणीत एनडीए या तीन प्रमुख धुरंधरांमध्ये यंदा विधानसभेचा सामना रंगला आहे. त्यासाठी तिन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. तर, मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यापासून या निवडणुकीत अधिकच रंगत भरली गेली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये 'मेट्रो मॅन' ई श्रीधरन यांच्यासाठी प्रचार करताना पिनरायी विजयन सरकारवर टीका केली. यासाठी पंतप्रधान मोदींनी गोल्ड स्मगलिंग स्कॅन्डलचा उल्लेख केला.