नागपूर : वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी मेट्रो स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. यानंतर पंतप्रधान फ्रीडम पार्क येथून मेट्रोने खापरीला रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान विविध वर्गातील नागरिक, महिला व मुलांशी त्यांनी संवाद साधला.
पंतप्रधान यांच्या हस्ते नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी ४० किलोमीटर असून एकूण खर्च ९ हजार २७९ कोटी रुपये आहे. प्रवासी क्षमता १ लाख ५० आहे. त्याचबरोबर नागपूर मेट्रो दोन या प्रकल्पाचा शुभारंभ त्यांचा हस्ते झाला आहे. नागपूर मेट्रो-२ हा एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. त्याअंतर्गत ४३८ किलोमीटरची मेट्रो लाईन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत पूर्ण होईल. खापरीला बुटीबोरी एमआयडीसी (१८.६ कि.मी. ) ऑटोमोटिव्ह चौकाला कन्हान (१३ किमी ) प्रजापतीनगरला कापसी (५.५ कि.मी.) तर लोकमान्यनगरला हिंगणा(६.७ कि.मी.) शहराशी जोडले जाईल.
दरम्यान, पंतप्रधान मोदी फ्रीडम पार्क येथून खापरीला रवाना झाले आहेत. खापरीला पोहोचल्यावर वाहनाने समृद्धी महामार्गाच्या झिरो पॅाईंट येथे पोहोचतील. संपूर्ण राज्यासाठी भाग्यरेखा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ७२० किलोमीटरच्या अत्यंत महत्वाकांक्षी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या रस्त्यावरून ते दहा किलोमीटर वाहनाने प्रवास करणार आहेत.