लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. वंचितने महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावर प्रत्युत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संजय, किती खोटं बोलणार! तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक येथील मीटिंगमध्ये तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला माहीत आहे! अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा केल्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते आघाडीचा आभास दाखवत आहेत तर दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे कारस्थान करत आहेत! हे तुमचे विचार आहेत!?
यासोबत पाठीच सुरा खुपसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो देखील आंबेडकरांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये सुरा खुपसलेल्या व्यक्तीवर वंचित तर हल्ला करणाऱ्या हातावर संजय राऊत असे लिहीलेलं आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नव्या आघाडीचे संकेत दिले होते. त्यासोबत उमेदवारांची घोषणा देखील केली. त्यानंतर भाजपला मदत होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका असे संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना म्हटलं होतं. त्यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.