मुंबई : आरक्षणाच्या प्रश्नावरुन छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. ओबीसी महासभेत छगन भुजबळांनी आज जरांगेंवर घणाघात केला. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनीही भूमिका मांडली आहे. राजकारणात एकमेकांना चॅलेंज नको. तर घटनेच्या चौकटीत राहून मागण्या पूर्ण करून घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर दिला आहे.
कुणाचंही आरक्षण न काढता मराठा आरक्षण देता येईल. मात्र योग्यवेळ आल्यावर आपण याची व्याप्ती काय आहे, कशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येईल हे आपण सांगणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. राजकारणात चॅलेंज नको तर घटनेच्या चौकटीत राहून मागण्या पूर्ण करून घेण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
तर, राज ठाकरेंनी हे जरांगे पाटीलच आहेत कि त्यांच्या मागे आणखीन कोण आहे ते येणाऱ्या काळात कळेल, असे निशाणा साधला होत. यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, राज ठाकरे यांचा सुद्धा बोलावता धनी कोण याचं उत्तर त्यांनी द्यावं, असा चिमटा आंबेडकरांनी राज ठाकरेंना घेतला आहे.
दरम्यान, पाच राज्यांच्या निकालासंदर्भात बोलतांना त्यांनी तेलंगणा येथे बीआरएस पक्षाची स्थिती उत्तम असून छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसची परिस्थिती चांगली आहे. राजस्थानला आपण गेलो नसल्याने या संदर्भात बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितले. तर लोकसभेच्या तयारीला वंचित बहुजन आघाडी पक्ष लागला असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांपासून लोकांना सावध करण्याचं कार्य सुरू असल्याचंही आंबेडकरांनी म्हंटले आहे.