उदय चक्रधर | गोंदिया : अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी फुटली नसल्याचा दावा सातत्याने करण्यात येत आहे. यामुळे शरद पवार अजित पवारांना साथ देणार का? असा प्रश्न सर्वांनाच आहे. अशातच, प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार आमचे नेते आहेत. ते सोबत आले तर राष्ट्रवादी एक संघ राहणार असल्याचे पटेलांनी म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपाच्या 106 आमदाराचा मला दुःख वाटते इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली त्यांच्या जागी मी असते तर मला दुःख झाले असते, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यावर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, भाजपा आणि राष्ट्रवादी आणि एकमेकांना साथ देण्याचे आम्ही ठरवलं आहे. आम्ही एनडीए याचे घटक झालो आहेत आणि मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये केंद्रामध्ये मोदी सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यात २०१९ च्या निवडणुकीत जनतेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले नव्हते. तेव्हा जनतेने विरोधात बसण्याचा जनादेश दिला होता. मात्र तेव्हा राज्याच्या विकासासाठी कट्टरवादी असलेल्या शिवसेनेशी (ठाकरे) आघाडी करुन सत्तेत सहभागी होण्यात काहीच गैर नाही वाटले नाही. मग आम्ही सुद्धा राज्याच्या विकासासाठी युतीत सहभागी झालो मग आता विरोध का केला जात आहे, असा सवालही प्रफुल्ल पटेल यांनी केला.
युतीत सहभागी होण्याचा निर्णय आम्हा एक-दोन नेत्यांचा नव्हता तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. आमच्या सोबत पक्षाच्या ५३ पैकी ४३ आमदार अधिकृतपणे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाचा यावर निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरच येणार असून त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्या गटाची बाजू भक्कम आहे आणि कोणासोबत किती जण हे देखील स्पष्ट होईल, असे देखील पटेल यांनी सांगितले.