पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे सर्व थकित वीज बिल माफ करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथ अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
तीन, पाच, साडेसात किंवा त्याहून अधिक अश्वशक्ती असलेल्या सर्व विद्युत कृषीपंपाची थकीत वीजबिल माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासोबतच संजय गांधी निराधार योजनेला मिळणारे अनुदान एक हजाराहून वाढून ते दीड हजारांवर पोहोचल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांना शेतीसाठी अनूदान देण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी तीन वर्षांमध्ये 2 लाख 14 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच इतर शेतकरी उपकरणे खरेदीसाठी तब्बल 1 हजार 239 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी सभागृहात दिली. याशिवाय शेतीमाल ठेवण्यासाठी गाव तिथे गोदान, कापूस, सोयाबीन पिकासाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यास राज्य सरकार तयार असल्याचेही ते म्हणाले.