केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर विरोधी पक्षांनी तसेच बिगरसरकारी संस्थांनी शंका उपस्थित केल्यानंतर अखेर शनिवारी आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या पाचही टप्प्यांतील मतदानाची संपूर्ण आकडेवारी घोषित केली. मतदान केलेल्या मतदारांचा आकडाही आयोगाने प्रसिद्ध केला असून मतांच्या आकडेवारीमध्ये कोणतीही फेरफार अशक्य असल्याची ग्वाही आयोगाने दिली आहे.
प्रत्येक मतदानकेंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी 48 तासांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली होती. निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने न्यायालय हस्तक्षेप करून आयोगाला कोणताही आदेश देणार नाही, असे स्पष्ट केले होते. शिवाय, मतदानाची आकडेवारी तातडीने देण्यासाठी आयोगाला अधिक मनुष्यबळ लागेल, असे निरीक्षणही नोंदवले होते. मात्र, न्यायालयाच्या सुनावणीनंतर दुसऱ्याच दिवशी, शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पाचही टप्प्यांतील प्रत्येक मतदारसंघात मतदान केलेल्या मतदारांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक, ही आकडेवारी प्रत्येक मतदान केंद्रावरील उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना ‘17-C’ या अर्जाच्या विहित नमुन्याद्वारेदिली जाते. तरीही ही आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यास आयोगाने न्यायालयात नकार दिला होता. शनिवारी हीच आकडेवारी नागरिकांसाठी उघड करण्यात आली.
ही आकडेवारी जाहीर करताना निवडणूक आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यात एकूण 66.14 टक्के, दुसऱ्या टप्प्यात 66.71टक्के, तिसऱ्या टप्प्यात 66.68 टक्के, चौथ्या टप्प्यात 69/16 टक्के आणि पाचव्या टप्प्यात 62.20 टक्के मतदान झाले आहे. आयोगाने 19 एप्रिलच्या पहिल्या टप्प्यानंतर 11 दिवसांनी, तर 26 एप्रिल रोजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर 4 दिवसांनी 30 एप्रिल रोजी मतदानाची अंतिम टक्केवारी प्रसिद्ध केली होती.