दिल्लीत आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानावरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना माफी मागणी लावून धरली आहे. अशातच, राहुल गांधींच्या घराबाहेर पोलिस पोहोचले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राहुल गांधींनी वेळ मागितला असल्याने पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस दिली आणि परतले आहेत. त्यावरच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
राहुल गांधी यांच्या घरी पोलीस आले त्यावर संजय राऊत म्हणाले की, दिल्लीत आणि देशात अशी अनेक लोक आहेत, ज्यांच्या घरी पोलीस, ईडी आणि सीबीआय जायला हवी. पण, सर्वांना संरक्षण मिळत आहे. विरोधकांच्या घरी पोलीस जात आहेत. आता राहुल गांधींच्या घरी पोलीस गेल्याचं पाहिलं. घरी जाऊन दहशतवाद निर्माण केला, तरी विरोधकांनी ठरवलं आहे, काही झालं तर झुकायचं नाही. त्यामुळे काही फरक पडत नाही. असे राऊतांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, देशातील काही निवृत्त न्यायामूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत, असं वक्तव्य विधिमंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. याबद्दल बोलताना संजय राऊतांनी सांगितलं, न्यायालयाला सरळ सरळ धमकी देऊन, हा दबाव आणण्याचा प्रकार आहे. जनता हे पाहत आहे. अशी देखील टीका त्यांनी यावेळी केली.
काय म्हणाले होते पोलीस?
आम्ही येथे राहुल गांधींशी बोलण्यासाठी आलो आहोत. राहुल गांधी यांनी भारत जोडोदरम्यान 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये विधान केले होते की, भेटीदरम्यान ते अनेक महिलांना भेटले आणि त्यांनी त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितले. त्याबाबतची माहिती गोळा करण्यासाठी आम्ही आलो आहेत. जेणेकरून पीडितांना न्याय मिळू शकेल. पोलिसांनी 15 मार्चला या प्रकरणाची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पण अपयश मिळाले आणि 16 मार्चला त्यांना नोटीस पाठवली होती.
दिल्लीतील त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. मात्र, अशी कोणतीही महिला सापडली नाही. आम्ही आधीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, राहुल परदेशात असल्याने भेटू शकलो नाही. पोलिसांनी लवकरात लवकर ही माहिती घ्यावी, जेणेकरून पीडितेला कोणतीही अडचण येऊ नये, ही माहिती घेण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे पोलिसांनी सांगितले होते.