पुणे : यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी नमन. अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यांनाही नमन करतो. मला जो पुरस्कार दिला तो माझ्या जीवनातला अविस्मरणीय अनुभव आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार मला मिळणं हे माझे भाग्य आहे. जे थेट टिळकांशी जोडले आहेत, त्यांच्याकडून मला पुरस्कार दिला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
काशी आणि पुण्याची विशेष ओळख आहे. इथे विद्वतेला अमरत्व प्राप्त झालं आहे. असे पुरस्कार मिळाल्यावर जबाबदारी अजून वाढते. मी हा पुरस्कार देशातील १४० कोटी जनतेला समर्पित करतो. टिळकांच्या काळापासून झालेल्या स्वतंत्रता आंदोलनात सगळ्यांना टिळकांनी छाप होती म्हणून ब्रिटिशांनी त्यांना असतोषांचे जनक म्हंटलं होतं. हा देश चालवता येणार नाही, असं इंग्रज म्हणत असताना टिळक म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. महात्मा गांधी यांनी त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हंटलं आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधानांना पुरस्कार देण्यात आला.टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.पंतप्रधान मोदी यांना खास उपरणे, पुणेरी पगडी, सन्मान पत्र आणि एक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. तसेच या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं. लोकमान्य टिळक पुरस्कारात एक लाख रूपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम पंतप्रधानांच्या सुचनेप्रमाणे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.