मुंबई : ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. तसेच, ८ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
आमदार अपात्रता प्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. ठाकरे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिकेत शिवसेनेची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी शिंदे गटाची मागणी आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ही याचिका दाखल केली असून 13 याचिकांवर आज तातडीची सुनावणी झाली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करत आहे का, अशी विचारणाही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केली.
दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला. यावेळी नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच म्हणत शिंदे गटाला पात्र ठरविले. सोबतच, ठाकरे गटाचे सर्व आमदार पात्र असल्याचेही निर्वाळा दिला होता. याविरोधात ठाकरे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहेत. तर, शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करत ठाकरे गटाच्या सर्व १४ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे.