मुंबई : भाजप (BJP) आज ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी मोर्चा करत आहेत. पाच वर्षे देशात सत्ता असताना झोपले होता का, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी विचारला आहे. तर आपण आव्हान स्वीकारले आहे. आता हा प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी केला आहे. राज्यस्तरीय ओबीसी अधिवेशनाचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलने आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादीतर्फे या अधिवेशनात अनेक ठराव मंजूर केले आहेत. राज्य शासनाला या ठरावातून एक रस्ता दाखवण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
आरक्षण उगीच कुणी मागत नाही. समाजात जातींमध्ये अंतर निर्माण होते. ते अंतर दूर करण्यासाठी आरक्षणाची मागणी केली जाते. समाज शिक्षण देत असताना महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येते, असेही पवारांनी सांगितले.
पन्नास टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहु महाराजांनी घेतला होता. ज्या लोकांनी विरोध केला त्यांना उदाहरणासहित आरक्षणाची गरज समजावली होती. परंतु, आजही खऱ्या अर्थाने या निर्णयाचे उद्दीष्ट सफल झालेले नाही. त्यात अनेक कमतरता आहेत. त्या दूर केल्या पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
मागास समाजाला आधार व सवलत देण्याची गरज आहे. नक्की त्यांची लोकसंख्या किती आहे, अशी शंका काहीजण उपस्थित करतात. यासाठीच केंद्राने जातनिहाय जनगणना करावी, अशी आमची मागणी आहे. फुकटचे कुणालाच नको आहे. जो न्यायाचा अधिकार आहे, तो मिळायला हवा यासाठी जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय गत्यंतर नाही. परंतु, ज्यांच्या हाती देशाची सूत्रे आहेत. ते निर्णय घेतील, असे वाटत नाही. म्हणूनच आपल्याला एकत्र येऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सत्तेवर असलेल्यांची मानसिकता वेगळी आहे. जातनिहाय जनगणनेने सत्य पुढे आले तर देशात अस्वस्थता निर्माण होईल व ऐक्य बिघडेल, असा आरोप केला जात आहे. पण, समाजाचे स्वास्थ आणि ऐक्य आम्ही अबाधित राखू, असा विश्वास शरद पवारांनी दिला.
राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी आज भाजपाने मुंबई कार्यालय ते मंत्रालय असा मोर्चा काढला आहे. यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, भाजप आज ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा करत आहेत. पाच वर्षे देशात सत्ता असताना झोपले होता का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. तर आपण आव्हान स्वीकारले आहे. आता हा प्रश्न सुटल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार शरद पवार यांनी केला आहे. यावेळी न्यायालयाबाबत बोलण्यास पवारांनी नकार दिला आहे.
महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होतील. पण, यात ओबीसी आरक्षण प्रश्न मार्गाला लावूनच निवडणुका झाल्या पाहिजे, अशी आग्रहाची भूमिका आम्ही राज्य सरकार तसेच राष्ट्रवादी पक्ष घटक म्हणूनही घेतो. यासाठी देशात चळवळ अभी राहिली पाहिजे. यासाठी आपण एकत्र यायला हवे, असे आवाहन शरद पवारांनी नागरिकांना केले आहे.