आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांचा निवासस्थानी भेटीसाठी गेले होते. या नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. त्यातच आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या भेटीवर जोरदार टीका केली आहे. या आधी हे लोक अशाच पद्धतीने ‘मातोश्री’वर जात होते. कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो, हे आपण बघतच आलो आहोत, अशी विखारी टीका पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.
काय म्हणाले नाना पटोले ?
नाना पटोले आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुण्यातील गणपती मंडळांना भेट दिली त्यावेळी ते म्हणाले की, ‘‘ प्रत्येकजण गणेशोत्सव साजरा करीत असतो.आपल्या प्रत्येकासाठी हे आनंदाचे दिवस असतात. कोरोनामुळे आम्ही आमचा धर्म आमची संस्कृती या सगळ्या पासून दुरु झालो होतो. मात्र, सण साजरे करताना सामान्य माणसाला महागाईचा विचार करण्याची गरज आहे.जनतेच्या दृष्टीने महागाई हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे महागाई कमी करण्याची सुबुध्दी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारला दे, अशी प्रार्थना मी विघ्नहर्त्या गजाननाकडे केली आहे.’’ असे त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘‘ हेच लोक पूर्वी दहा वेळा मातोश्रीवर जात होते. त्यामुळे कोण कुणाला भेटतं आणि कोण कुणाचा मुडदा पाडतो हे आपण बघतच आलो आहे. त्यामुळे मी यात पडणार नाही. देशात सर्वाधिक महागाई आपल्या राज्यात आहे. महागाई कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्या, इतकीच माझी मागणी आहे.’’असे बोलत त्यांनी केंद्र सरकारला महागाई कमी करण्याची मागणी केली आहे.