राज्यात प्रचंड राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. आधीच मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले नेते या पालकमंत्र्यांच्या यादीवर पुन्हा नाराज झाल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा आधीपासूनच होत आहे. अशातच खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बहिणीला म्हणजेच पंकजा मुंडे यांना पालकमंत्री पद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. अंबाजोगाई येथे एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.
अंबाजोगाई तालुका हा चारही बाजूंनी राष्ट्रीय महामार्गांनी वेढला गेला आहे. कुठल्याही तालुका, जिल्ह्याच्या विकासात दळणवळण, रस्त्यांचे मोठे योगदान असते. पंकजा मुंडे पालकमंत्री असतांना बीड जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती मिळाली. परतु गेल्या काही काळात राहिलेला बॅकलाॅग भरून काढण्यासाठी पुन्हा पंकजाताई यांना बीडचे पालकमंत्री पद मिळावे, अशी माझी देखील इच्छा आहे. असे विधान प्रीतम मुंडे यांनी बोलताना केले.
पंकजा मुंडे नाराज असल्याची होत्या चर्चा
पंकजा यांच्यावर पक्षनेतृत्वाने अन्याय केल्याची भावना स्वतः पंकजा यांनी देखील अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली होती. पक्षाने त्यांना आमदारकी, राज्यसभेची संधी देण्याऐवजी संघटनेचे जबाबदारी टाकली.पण पंकजा समर्थकांना ही जबाबदारी म्हणजे त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्नच वाटला. परळीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना पक्षाने बाजूला टाकल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केला गेला.