बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मागील काही दिवसांपासून भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच, आज पंकजा मुंडे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर मनातील खदखद व्यक्त केली. आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, असे म्हणत मुंडे यांनी अप्रत्यक्षरीत्या फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, असं म्हणत पंकजा मुंडेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच आपली खदखद व्यक्त केली. महाभारतातील अर्जुन आणि कर्ण यांच्या रथाचे उदाहरण देत पंकजांनी थेट फडणवीसांवर शरसंधान डागले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भाषणातील कर्ण आणि अर्जुन कोण? यावरून आता राजकिय वर्तुळात चर्चा होत आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
18 वर्ष पदावर असणाऱ्यांनी शिक्षकांसाठी काहीच केलं नाही. या निवडणुकीत ज्ञान देण्याचं काम नाही कारण ते ज्ञान दानाच काम करतात. मी शिक्षक परिवारातून आहे. मला, भारतीय जनता पार्टी आणि मुंडे साहेब वेगळे करता येणार नाही. तेव्हा राजकारण वेगळे होते. आता वेगळे आहे. योग्य प्रोटॉकॉलनुसार मला जिथे पोहचायचे मी तिथे पोहचते. आम्ही भारतीय जनता पार्टीला बांधील आहोत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.