बीड : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरला. त्याच जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा झाली आहे. या सभेत सर्व ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. परंतु, पंकजा मुंडे अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले होते. अखेर पंकजा मुंडेंनी स्वतःच अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे.
पक्षाने या सभेला कोण जायचं हे ठरवले होते, अशी सूचक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. तसेच, आजचं पीच छगन भुजबळ यांचं होतं. त्यामुळे मी या ठिकाणी गेले नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. मला ओबीसीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण अथवा मानपान देण्याची गरज नाही. बहुजनाच्या संघर्षासाठी निमंत्रणाची गरज नसल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हंटले आहे.
दरम्यान, ओबीसी सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. काही लोक म्हणतात की मी दोन वर्ष तुरुंगात बेसन भाकर खाल्ली. त्यांना मी सांगतोय की होय मी खाल्ली, अगदी दिवाळीतही मी बेसन भाकर ठेचा कांदा खाल्ला पण तुमच्या सारखा सासऱ्याच्या घरी भाकरीचे तुकडे मोडत नाही, अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे. मराठा तरुणांनी या शेंदूर लावलेल्या दगडाच्या मागे फिरू नये. काही लोक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भुजबळांनी केली.