संपूर्ण देशाचे लक्ष आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नंतर राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रेसला जवळपास 136 जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. या विजयावरून महाराष्ट्रात देखील जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून देखील भाजपवर टीका केली जात आहे. याच टीकेवर आता मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकामध्ये काँग्रेसचा विजय झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्याकडून भाजपवर टीका करण्यात आली होती. या टीकेनंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना ते म्हणाले की, बघा आता पराभव कोणाचा विजय कोणचा हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. परंतु दुसऱ्यांचे घर जळताना आपल घर जळतंय ते विझवायचं सोडून दुसऱ्यांचे घर जळताना आनंद घेणारे काही लोक आहेत. असुरी लोक असतात. अशी टीका त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, हिंदीमध्ये एक म्हण आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असे म्हणतात. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार, म्हणून या महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतलेले आहेत. काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणारी महाराष्ट्राची जनता आहे. असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.