मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आज विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. आज त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये श्री गणेशाची आरती संपन्न झाली. यानंतर या परदेशी पाहुण्यांसाठी खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी आयोजित करण्यात आली होती. विविध देशांच्या या राजदूतांनी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा आनंद घेतला. तसेच मोठ्या उत्साहात आणि आनंदात आरतीही केली. तसेच श्री गणेशाचा आवडता नैवेद्य असलेल्या उकडीच्या मोदकांचा देखील आस्वाद घेतला.
यात श्रीलंका, मॉरिशस, स्वीडन, स्वित्झर्लंड, यूएई, अमेरिका, येमेन, कोरिया, चिली, चायना, मेक्सिको, जर्मनी, इंडोनेशिया, इराक, इराण, आयर्लंड, इटली, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, बहारिन, बेलारूस या देशांच्या भारतीय राजदूतांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजदूतांचे स्वतः जातीने उपस्थित राहून अगत्याने स्वागत केले.
दरम्यान, त्यांना खास भेट देऊन सन्मानितही केले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या आदरातिथ्याने आपण पुरते भारावून गेलो आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यानिमित्ताने मुंबईतील घरोघरी साजरा केला जाणारा खरा गणेशोत्सव अनुभवण्याची संधी मिळाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि राजशिष्टाचार विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.