मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा दिला. तर, 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. अशातच, एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मोठा धक्का देत संसदीय गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. या जागेवर गजानान किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
जर खोके घेत गुडघे टेकले असते तर त्या पदावर राहिले असतो. आम्हालाही सांगण्यात आले होते की, कशाला राहताय, काय राहिलंय तिकडे, आमच्याकडे या. त्यावर मी म्हटलं, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी बेईमानी करणार नाही. अशी अनेक पद ओवाळून टाकू. आम्ही स्वाभिमानी आणि निष्ठावंत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
माझ्या पक्षाने भरपूर दिलं आहे. लाचारी पत्करणारा मी नाही. बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले संस्कार निष्ठेचे आणि इमानदारीचे आहेत. पदासाठी, सत्तेसाठी गुडघे टेकण्याचे नाहीत. पद आज गेलीत, उद्या परत येतील. तेवढी हिंमत आमच्या पक्षात आणि नेतृत्वात आहे, असेही संजय राऊतांनी म्हंटले आहे.