राज्यात शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर समीकरण बदलून गेले आहेत. त्यातच आता संधीचा फायदा घेत भाजपने जोरदार फिलडिंग लावली आहे. भाजपने थेट आता राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ल्यावर झेंडा फडकावण्यासाठी कंबर कसली आहे. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. बावनकुळे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीविषयी महत्वाचं विधान केलं आहे. या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
काय म्हणाले बावनकुळे?
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की, 2024 ची निवडणूकही भाजप एकहाती जिंकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात 400 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू. तर महाराष्ट्रात 45 जागा आमच्याकडे असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
देशात अनेकजण निवडणुका 40-40 वर्षे जिंकले. मात्र त्यांचे गड मोदींच्या नेतृत्वात उध्वस्त झाले. बारामतीचाही गड उध्वस्त करणार!, असा निर्धार बावनकुळेंनी बोलून दाखवला.आतापर्यंत कधीही मोठी लढाई बारामतीत झाली नाही. एवढी मोठी लढाई येत्या निवडणुकीत होईल, असे विधान देखील त्यांनी त्यावेळी केले.
निर्मिला सितारमण देखील येणार बारामती दौऱ्यावर
आज भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती दौऱ्यावर आहेत. त्यावेळी संघटन मजबूत करायचंय. विकासकामे पुढे न्यायचीत. जनतेला आतापर्यंत जे मिळालं नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय. असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, 18 महिन्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची बारामती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सितारमण यांचा देखील पुढील काही दिवसात बारामतीसाठी अनेक दौरे होतील, अशी बावनकुळे यांनी माहिती दिली आहे.