नागपूर : नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता महाविकास आघाडीने राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यासंबंधीचे पत्र मविआच्या नेत्यांनी विधानसभा सचिवांना दिले आहे. त्यामुळे आता यावर विधानसभा सचिव काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासूनच विरोधकांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले जात नाही. प्रश्न मांडू दिले जात नाही. तसेच, राहुल नार्वेकर शिंदे गट व भाजपला झुकते माप देतात, असे आरोप केले जात होते. तर, नाना पटोलेंनी अविश्वास प्रस्ताव ठराव मांडणार असल्याचेही बोलून दाखविले होते. यानुसार अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी मविआ नेत्यांनी राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. सचिवांना दिलेल्या पत्रावर 39 आमदारांच्या सह्या आहेत. त्यामुळे आता यावर विधानसभा सचिव काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.