पाटणा : बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. नितीश कुमार यांचे हे पाऊल इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, आता नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार आज दुपारी 4 वाजता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ही 9वी वेळ असेल. त्यांच्यासोबत भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री होणार आहेत. उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस कायम आहे. मात्र, सुशील मोदी आणि रेणू देवी उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच, नितीश कुमार यांच्यासोबत 6 ते 8 नेते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. जीतन राम मांझी यांच्या 'हम' या पक्षाचाही नव्या सरकारमध्ये समावेश होणार आहे.
बिहारमधील जागांचे समीकरण
बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आरजेडी आहे. भाजपचे ७८, जेडीयूचे ४५ आणि एचएएमचे चार आमदार आहेत. या तिन्ही पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या 127 आहे. सरकार स्थापनेसाठी 122 जागांची गरज आहे.