नवी दिल्ली : बिहारमध्ये राजकीय भूकंपानंतर आज जेडीयू-राजद सरकारचा शपथविधी पार पडला आहे. यावेळी नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, लालू प्रसादचे सुपूत्र तेजस्वी यादव यांनी उपमुख्यंत्री पदाची शपथ ग्रहण केली आहे. राबडी देवी आणि दशरथ मांझी यांच्यासह बिहारमधील अनेक बडे नेते उपस्थित होते.
भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नेते नितीश कुमार यांनी सात पक्षांच्या 'महागठबंधन'सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष आहेत. मंगळवारी नितीश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला होता. यावेळी 164 आमदारांची यादी राज्यपालांना सादर करत राजदसोबत सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर आज नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, आमदारांसोबतच्या बैठकीत नितीश कुमार यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा जेडीयूमध्ये सतत फूट पाडण्याचे काम करत आहेत, असा आरोप केला होता. नितीश कुमार यांनी पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचाही आरोप केला होता.